गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेने विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. या जनतेला मी शत शत नमन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना काढले. विकासाच्या माध्यमातूनच जनसामान्यांच्या समस्येचं समाधान होईल, वैश्विक स्पर्धेच्या युगात जर भारताला पुढे जायचं असेल तर भारतानेही नवी उंची गाठली पाहिजे, असे सांगत ‘जितेगा भाई जितेगा विकासही जितेगा’, अशी नवी घोषणा कार्यकर्त्यांना दिली. काँग्रेसच्या ‘विकास वेडा झालाय’ या प्रचार मोहिमेला मोदींनी या घोषणेच्या रूपात उत्तर दिल्याचे सांगण्यात येते.

मोदी म्हणाले, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी विरोधकांकडून जीएसटीमुळे भाजपचे मोठे नुकसान होईल असे सांगण्यात आले. अपप्रचार करण्यात आला. परंतु, या सर्व ठिकाणी पक्षाला मोठे यश मिळाले. या निवडणूक निकालांनी एक गोष्ट सिद्ध झाली की, देश रिफॉर्मसाठी तयार आहे. जनता परफॉर्म करणाऱ्या पक्षाकडे सकारात्मक नजरेने पाहत आहे. लोकशाहीत निवडणुकीत सरकारच्या कामाचा लेखाजोखा दिसतो. आज देशातील विशेषत: मध्यम वर्गातील लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या त्वरीत पूर्ण व्हाव्यात, असं वाटणं हे स्वाभाविकच असल्याचे सांगत आधीच्या सरकारने सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नसल्याचा आरोप केला.

जर तुम्ही विकास करत नसाल, चुकीच्या कामात गुंतलेले असाल तर पाच वर्षांनतर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही. या निवडणुकीत लोकांनी विकासाला मत दिलं आहे. गुजरातच्या निवडणुका अभूतपूर्व ठरल्याचे त्यांनी म्हटले. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या गुजरातचा विजय दुहेरी आनंदाचा ठरला असल्याचे ते म्हणाले. मी गुजरात सोडून तीन-साडेतीन वर्षे झाल्यानंतरही गुजरातच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचे नेतृत्व दिले. त्यामुळे मला मोठा आनंद झाला आहे. माझ्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी गुजरातच्या विकासासाठी काहीही कमी केलेलं नाही. यासाठी मी मतदारांचे आभार मानतो व त्यांना शुभेच्छाही देतो.

प्रचारावेळी चारी बाजूंनी हल्ले झाले. अपप्रचार केला गेला. काँग्रेससह इतर अनेक शक्ती आपल्याविरोधात कार्यरत होत्या. विकासाची थट्टा करण्यात आली. पण इथे विकासाचाच विजय झाला. ३० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जातीयवादाचे विष पेरण्यात आले होते. ते विष काढता-काढता माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे ३० वर्षे गेलेत. आता कुठं गुजरातला जातीयवादातून मुक्ती मिळाली. त्याचवेळी यावेळी विरोधकांकडून पुन्हा हीच पद्धती अवलंबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन जात असल्याचे सांगत जनतेने आम्हाला निवडून देऊन यावर शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले.

यावेळी त्यांनी अमित शहांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. या सरकारकडे निर्णय घेण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, भाजपच्या मुख्यालयात मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींचा सत्कार केला. अमित शहा बोलायला उभे राहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. शहा यांना दोन ते तीन वेळा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे शहा यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.