आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात केंद्र सरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणारे तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवर चर्चा केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट असले तरी या चर्चेनंतर ‘तेलगू देसम’चे बंड शमणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा, अशी  ‘तेलगू देसम’ची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने चंद्राबाबू नायडू आक्रमक झाले. बुधवारी चंद्राबाबू नायडू यांनी निषेधाचे पहिले पाऊल म्हणून दोन्ही केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले. ‘रालोआ’तून आपला पक्ष बाहेर पडणार असून भाजपासोबत युती ठेवायची की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा निर्णय मी स्वतः कळवण्याचा प्रयत्न केला, पण ते दुरध्वनीवर आले नाही, असा आरोप नायडूंनी केला होता.

नायडूंच्या आरोपानंतर अखेर गुरुवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायडू यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला, दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा का दिला, याबद्दल नायडूंनी मोदींना सविस्तर माहिती दिल्याचे सूत्रांकडून समजते. नायडूंशी चर्चा केल्यानंतर ‘तेलगू देसम’चे केंद्रातील दोन्ही मंत्री संध्याकाळी मोदींची भेट घेणार आहेत.

एकीकडे मोदींनी चर्चा केली असली तरी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी वायएसआर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विशेष राज्याच्या मागणीवरुन खोटा प्रचार केला आणि मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले, असा आरोप केला. विशेष दर्जा देण्याबाबत आम्ही आंध्र प्रदेश सरकारशी चर्चा करत आहोत, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील घडामोडीनंतर आंध्र प्रदेशमध्ये नायडू सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. आता मोदी- नायडू चर्चेनंतर हा वाद संपुष्टात येणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.