स्वातंत्र्यदिन भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठोस प्रतिपादन

नवी दिल्ली : देशात बेसुमार वाढत असलेली लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून ती रोखण्यासाठी आता ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली.

लोकसंख्यावाढीने भावी पिढय़ांसमोरील आव्हाने वाढत असून केंद्राप्रमाणेच राज्य सरकारांनीही ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.

जेव्हा अधिकाधिक लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न राहतील तेव्हा देशही बौद्धिकदृष्टय़ा आणि आरोग्यदृष्टय़ा धडधाकट होईल. त्यामुळेच आपल्या कुटुंबाचा आकार लहान ठेवणाऱ्यांचा आदर केला पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.

देशातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नाला स्पर्श करताना ते म्हणाले की, प्रत्येक घराला २०२४पर्यंत जलवाहिनीद्वारे शुद्ध पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन मोहीमे’साठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आज देशातील निम्म्या घरांना पाइपद्वारे पाण्याचा पुरवठा होत नाही. महिलांना कित्येक मैलांची पायपीट करून पाणी मिळवावे लागते. हे चित्र बदलले जाईल, असे ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कल्पनेचेही त्यांनी समर्थन केले. यावर देशव्यापी चर्चा घडली पाहिजे, असे ते म्हणाले.

संपत्ती निर्माण करणाऱ्यांकडे संशयाने पाहिले जाऊ नये. ते देशाचीच संपत्ती आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.

आम्ही निर्णय घेण्यात वेळ लावत नाही, कोणताही प्रश्न निर्माण करीत नाही की चिघळवत नाही, असे सांगत त्यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे जोरदार समर्थन केले. काश्मीरच्या पंखात आम्ही नव्याने बळ निर्माण करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची वाळवी समाजाला लागली होती. त्यांना आम्ही दूर करीत आहोत. सरकारने तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने भ्रष्टाचार रोखण्याची मोहीमच उघडली आहे. पण ही कीड इतकी खोलवर पोहोचली आहे की केवळ सरकारी पातळीवर प्रयत्न करून उपयोग नाही. प्रत्येक नागरिकानेही त्याच्या त्याच्या पातळीवर भ्रष्टाचाराविरोधात उभे राहायला हवे, असे मोदी म्हणाले.

तिन्ही सेनादलांचा संयुक्त प्रमुख!

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कारवायांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी तिन्ही सेनादलांचा संयुक्त प्रमुखही नेमण्याची घोषणा मोदी यांनी केली. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या पाश्र्वभूमीवर ही कल्पना प्रथम मांडली गेली होती. देशासमोरील संरक्षणविषयक आव्हाने लक्षात घेऊन तिन्ही सेनादलांना अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

पाकिस्तानवर नाव न घेता टीका

दहशतवादाला जे बळ देतात आणि आश्रय देतात त्यांना उघडे पाडण्याचा आमचा निर्धार आहे, या शब्दांत मोदी यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला. शेजारचे देश जर आमच्या विरोधातील दहशतवादाला आळा घालणार नसतील, तर त्यांच्या हद्दीत लक्ष्यभेदी कारवाया करून आम्ही आमचा बदललेला पवित्रा आधीच दाखवून दिला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

लोकसत्ता : आमची भूमिका

लेकुरे उदंड झाली..

पंतप्रधानपदी आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पारंपरिक भाषणाचा वापर धोरणात्मक मुद्दे सूचित करण्यासाठी केला. स्वच्छ भारत अभियान, मंगळयान आदी अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी प्रथम लाल किल्ल्यावरूनच मांडले. कालच्या भाषणातील लोकसंख्या नियंत्रणाबाबत त्यांनी मांडलेला मुद्दा याच मालिकेतील. त्याचे स्वागत. दुसऱ्यांदा निवडून आल्यावर त्यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरवर नेण्याचे स्वप्न दाखवले. लोकसंख्या नियंत्रणाशिवाय ते अपूर्ण आहे. कारण लोकसंख्या नियंत्रणात राहिली नाही, तर देशाची अर्थव्यवस्था वाढूनही नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणारच नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य अधिक नागरिकांत विभागले गेले की प्रत्येकाच्या पदरात पडणारा वाटा कमी होणार, इतके हे साधे समीकरण आहे. म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत असताना निर्माण होणाऱ्या संपत्तीचे वाटप कमी लोकांस करावे लागणे हे देशाच्या हिताचे आहे. म्हणूनच लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याची गरज पंतप्रधानांनी बोलून दाखवली, हे चांगले झाले. अर्थात, लोकसंख्या नियंत्रणाचा गंभीर मुद्दा एखाद्या धर्माविरोधात वापरण्याचा क्षुद्र विचार त्यांच्या मनात नसेलच. निदान तो तसा नसावा. समर्थ रामदासांनी चारशे वर्षांपूर्वी सांगून ठेवल्यानुसार ‘लेकुरे उदंड  झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापुडे भिकेस लागली, काही खाया मिळेना’, हे वास्तव धर्मनिरपेक्ष आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रयत्न याच धर्मनिरपेक्षपणे व्हायला हवा.