७५व्या स्वातंत्र्यदिनाचा आज देशभरात उत्साह आहे. देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्याला आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. प्रथेप्रमाणे या वर्षी देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये करोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडलं. मात्र, यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने भारतानं अजून एक पाऊल पुढे टाकल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

“सगळ्यांना आपापली जबाबदारी पार पाडावी लागेल”

“देशासाठी ही गर्वाची बाब आहे, की शिक्षा असो वा खेळ.. बोर्डाचे निकाल असो वा ऑलिम्पिकचं मैदान, आपल्या मुली आज अभूतपूर्व कामगिरी करत आहे. भारताच्या मुली आपली जागा घेण्यासाठी आतुर आहेत. आपल्याला हे निश्चित करावं लागेल, की प्रत्येक क्षेत्रात महिलांचा समान सहभाग असेल. आपल्याला हे ठरवायचंय की रस्त्यापासून कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची भावना व्हावी, सन्मानाची भावना व्हावी. त्यामुळे देशातील सरकारला, प्रशासनाला आणि नागरिकांना आपली १०० टक्के जबाबदारी पार पाडावी लागेल. हा आपल्याला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा संकल्प बनवावा लागेल. मी आज हा आनंद देशवासीयांसोबत साजरा करतोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

 

“…तर भारताला लस कधी मिळाली असती?” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरण मोहिमेचं केल कौतुक!

मोदी म्हणाले, लाखो मुलींनी मला संदेश पाठवले…

देशात सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने दिसत असताना सेनेमध्ये मात्र हे प्रमाण बरंच व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर लष्करामध्ये आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय मोदींनी यावेळी जाहीर केला. “मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की त्या देखील सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जावेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग आम्ही सुरू केला होता. आता सरकारने ठरवलं आहे की देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडलं जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील”, असं मोदींनी यावेळी जाहीर केलं.