‘गगनयान’मधून स्वबळावर पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारत अवकाशात २०२२पर्यंत स्वबळावर पहिला अंतराळवीर पाठवील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी, नवा भारत घडविण्याचा आमचा संकल्प असून त्यासाठी देह आणि आत्म्याचे ऐक्य आम्ही साधले आहे, असे ठामपणे सांगितले.

२०२२ साल हे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे वर्ष आहे. त्यामुळे तोपर्यंत भारताचा अंतराळवीर मग ती महिला असो वा पुरुष, भारताचा झेंडा घेऊन अवकाशात पाऊल ठेवतील, असे मोदी म्हणाले.

आपल्या नेतृत्वाखाली देश झपाटय़ाने प्रगती करीत आहे, असा दावा करीत, २०२२पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या निर्धाराचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

वाजपेयींचा आदर्श

जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार ‘गोली आणि गाली’ने नव्हे, तर बंधुभावाने पुढचे पाऊल टाकणार आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्नी अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियत’चाच मार्ग स्वीकारला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अर्थात काश्मीरचा प्रश्न केवळ लष्करी बळाने सुटणारा नाही, हेच एकप्रकारे सूचित करून मोदी म्हणाले की, आम्हाला काश्मीरमधील सर्वच भागांचा संतुलित विकास साधायचा आहे. मग तो लडाखचा प्रांत असो, जम्मू असो की श्रीनगरचे खोरे असो. तेथील सर्वसामान्यांच्या आशाआकांक्षांची पूर्ती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

काश्मीरमध्ये सध्या केंद्राकडून खेडय़ांना थेट पैसा मिळत आहे. त्यामुळे काश्मीरसाठीच्या निधीचा अधिक प्रभावी वापर होत असल्याने पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीवर आमचा भर राहील. गेली काही वर्षे त्यांच्या निवडणुकाच पार पडलेल्या नाहीत. त्या आता सप्टेंबरपासून घेतल्या जातील, असेही मोदी यांनी जाहीर केले. काश्मीर विकासासाठी तेथे आयआयटी, आयआयएम आणि एम्स स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली.

नवभारताचा संकल्प

आपल्या भाषणाचा शेवट मोदी यांनी काव्यपंक्तींनी केला. ते म्हणाले, ‘‘हम तोड रहे है जंजीरें, हम बदल रहे है तसवीरें, ये नवयुग हैं नवभारत हैं, खुद लिखेंगे अपनी तकदीरें!’’

तामिळी काव्यपंक्ती..

आपल्या भाषणात मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांच्या कवितेच्या काही ओळी तामिळमध्येच वाचून दाखवल्या आणि नंतर त्यांचा अनुवादही ऐकवला. ‘भारत संपूर्ण जगाला सर्व बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवील,’ असा या कवितेचा आशय होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत खंबीर नेतृत्व न उरल्याच्या पाश्र्वभूमीवर भाषणातला हा तामिळी स्पर्श सूचक होता.

निवडणुकीआधीचे भाषण!

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी अगदी आटोपशीर भाषण केले होते. आता २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीआधीचे लाल किल्ल्यावरून होणारे हे अखेरचे भाषण असल्याने मोदी तब्बल ८० मिनिटे बोलले. १९४७मध्ये पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून ७२ मिनिटांचे भाषण केले होते. २०१५पर्यंत, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेले ते सर्वात मोठे भाषण मानले जात होते.

आयुष्मान भारत

देशातील ५० कोटी नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करणारी ‘आयुष्मान भारत’ ही योजना २५ सप्टेंबरपासून कार्यान्वित होईल, असेही मोदी म्हणाले. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून सुरू होणाऱ्या या योजनेद्वारे प्रत्येक गरीब कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत लाभणार आहेत.

तिहेरी तलाक रोखणारच

मुस्लिम महिलांना आम्ही न्याय मिळवून देऊच, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. तिहेरी तलाकविरोधी विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले. माझे सरकार गरीब आणि मागास जातीजमातींसाठी भरीव कार्य करीत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

‘गनगनयान’ आवाक्यात..

‘गगनयान’ची तांत्रिक सज्जता पूर्ण झाली असून पंतप्रधानांच्या सांगण्याप्रमाणे २०२२पर्यंत ते अवकाशात झेपावणे सहज शक्य आहे, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. जीएसएलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाद्वारे हे यान अवकाशात सोडले जाईल, असे ते म्हणाले. या मोहिमेआधी दोन मनुष्यरहित यानेही सोडण्यात येणार आहेत.