काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भरत सिंह सोळंकी तब्बल १०० दिवस करोनाशी लढा देत होते. १०० दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर भरत सिंह सोळंकी यांना डिस्चार्ज देण्यात आला. जून महिन्यात भरत सिंह सोळंकी यांना करोनाची बाधा दिली होती. पण त्यानंतर त्यांनी धैर्याने करोनाचा सामना केला आणि अखेर त्यावर मात केली. भरत सिंह सोळंकी यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन त्यांची विचारपूस केली.

नरेंद्र मोदींनी स्वत: ट्विट करत आपण भरत सिंह सोळंकी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “भरत सोळंकी यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. करोनाविरोधातील १०० दिवसांच्या लढाईदरम्यान त्याने उल्लेखनीय धैर्य दाखवलं. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो”.

दरम्यान भरत सिंह सोळंकी यांनी रुग्णालयातून निघताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे आभार मानले.