मालदीव दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (रविवारी) श्रीलंका दौऱ्यावर पोहोचले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान ते श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे. दरम्यान, श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. श्रीलंकत इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 250 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 11 भारतीय नागरिकांचाही समावेश होता. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 आणि 2017 मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांचा हा तिसरा दौरा आहे.

यावेळी ते माजी राष्ट्राध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते महिंद्रा राजपक्षे यांचीही भेट घेतील. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले. श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांच्या दौऱ्यातून ‘नेबरहूड फर्स्ट’ हे धोरण भारतासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनाला भेट देत वृक्षारोपणही केले.

श्रीलंका दौऱ्यानंतर ते भारतात परतल्यावर थिरूमला येथील भगवान व्यंकटेश यांच्या मदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच ते या ठिकाणी पूजाही करतील.