काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटोनी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना त्यांची कौरवांशी तुलना केली. मोदी हे कौरवांचे नेते असून आगामी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्या कुरूक्षेत्र युद्धाची साक्षीदार बनेल. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कौरवांचा राहुल गांधी सर्वनाश करतील, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मार्चचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केले. आगामी निवडणूक ही देश वाचवण्यासाठी लढवली जाईल आणि ती एका युद्धाप्रमाणे असेल, असेही ते म्हणाले.

अँटोनी म्हणाले, यंदाची निवडणूक ही इतर संसदीय निवडणुकीप्रमाणे सोपी नसेल. हा देश, त्याचे संविधान, देशाची नैतिकता आणि मूल्यं, संवैधानिक संस्था आणि इतर संकटाचा सामना करत असलेल्या देशाला वाचवण्यासाठीचे हे युद्ध आहे. पंतप्रधान कौरवांचे नेते असल्याचे सांगत ते म्हणाले की, राहुल गांधी त्यांच्या सेनेचा पराभव करतील.

जनमहा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. काँग्रेसला आरएसएस आणि भाजपाकडून राष्ट्रवादाचे धडे शिकण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. केरळ सरकार आणि केंद्र सरकारचे अपयश दाखवण्यासाठी जनमहा यात्रा केरळमधील १४ जिल्ह्यातून जाईल. याची सांगता २८ फेब्रुवारीला तिरूवनंतपुरम येथे होईल.