International Yoga Day  : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथील मैदानात सुमारे ४० हजार लोकांसोबत योगासनं करणार आहेत. रांची येथील प्रभात तारा मैदानावर योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त रांचीच नाही तर देशभरातले कोट्यवधी लोक योग दिनाननिमित्त योगासनं करणार आहेत.

दिल्लीत ३०० ठिकाणी योग शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. क्लायमेट अॅक्शन या थीम अंतर्गत योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. रांची येथील प्रभात तारा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनं करणार असल्याने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हरयाणा येथील रोहतक या ठिकाणी योगासनं करणार आहेत. तर नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेवबाबांसोबत योगासनं केली.

आज संपूर्ण जगात भारतासह पाचवा योग दिवस साजरा करण्यात येतो आहे. योग करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची ही परंपरा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आधुनिक योग आपल्याला सर्व स्तरात पोहचवायचा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.