पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. देशात लवकरच लसीकरणास सुरुवात होणार असून नरेंद्र मोदी याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदींनी ही बैठक बोलावली आहे.

‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही करोना लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी ३ जानेवारीला परवानगी दिली. त्यामुळे आता लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे. लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असं औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केलं होतं. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली होती.

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लवकरात लवकर पुढील काही दिवसांत लस उपलब्ध होईल असं सांगितलं आहे. लसीकरणाबद्दल प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहाचावी यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी देशभरात ड्राय रनचा दुसरा टप्पा पार पडला. याचा आढावा त्यांनी घेतला.

‘कोव्हिशिल्ड’ ही लस ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली आहे. तिचे भारतातील उत्पादन ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही स्वदेशी लस आहे. तिचे उत्पादन भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने करीत आहे.