सध्याच्या आर्थिक परिस्थितीत भारतीय उद्योजकांनी जोखीम पत्कारून अधिकाअधिक गुंतवणूक करावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. ते मंगळवारी देशातील आघाडीच्या उद्योजकांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या मोठ्याप्रमाणावर संधी उपलब्ध असून भारताने त्याचा फायदा उठवला पाहिजे. त्यासाठी जोखीम पत्कारून जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे. इतकेच नव्हे तर आपण परदेशात जाऊनही गुंतवणूक केली पाहिजे. या सगळ्यात उद्योगक्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. दुसरीकडे उद्योजकांनी सरकारकडे व्याजदरात कपात करण्याची आणि उद्योगासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची मागणी केली. व्याजदर कमी झाल्यास अधिकाअधिक गुंतवणूक करणे शक्य होईल, असे उद्योजकांकडून सांगण्यात आले.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीचा भारताला कशाप्रकारे फायदा उठवता येईल, याबद्दल विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी भारतातील आघाडीचे २७ उद्योजक, बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठीच्या निमंत्रितांमध्ये मुकेश अंबानी, टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख सायरस मिस्त्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दिपक पारेख आणि अर्थतज्ज्ञ जहांगीर अझीज यांचा समावेश होता.