पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी आपल्या वाढदिवशी गुजरातमध्ये जाणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार ते त्यांची आई हिराबा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतील. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून वर्षानुवर्षे ते ही प्रथा सांभाळत आहेत. १७ सप्टेंबरला ते आपला ६६ वा वाढदिवस साजरा करतील. पुतणी निकुंजबेन मोदी यांच्या कुटुंबियांचीदेखील पंतप्रधान भेट घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निकुंजबेन यांचे सहा सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले होते. पंतप्रधानांचे छोटे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या त्या कन्या होत्या. ४१ वर्षाच्या निकुंजबेन पतीसह अहमदाबादमधील बोपाल परिसरात राहात होत्या. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नसून, ते आम्हाला भेटायला येणार की आम्ही सर्वजण गांधीनगरमध्ये आईच्या घरी भेटणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

एक दिवसाच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान दाहोद येथील लिमखेडा आणि नवसारीलादेखील जातील. दाहोदमध्ये ते एका सभेदरम्यान आदिवासिंच्या कल्याणकारी योजनांची घोषणा करतील. त्यानंतर पाण्याच्या दोन योजनांचा शिलान्यास त्याच्या हस्ते करण्यात येईल. यातील एक योजना कडाना बांधाची असून, दुसरी योजना छोटा उदयपूरच्या कावंट तालुक्यातील हटेश्वर बांधाची आहे. यावर्षी उन्हाळ्यात दाहोदमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. नवसारी येथे पंतप्रधानांच्या हस्ते ८७०० अपंगांना उपकरणे वाटण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. असे असले तरी, अद्याप पंतप्रधान कार्यालयातून कार्यक्रमाची अधिकृत रुपरेशा घोषित करण्यात आलेली नाही. पंरप्रधानांचे दुपारी आगमन होईल असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी जास्तीत जास्त अपंगांना एकत्र आणून ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे सुत्रांकडून समजते. पंतप्रधानांनी आदिवासी भागाला भेट देणे म्हणजे लोकांशी जोडण्यासाठीचा पक्षाने केलेला प्रयत्न असल्याचे मत भाजपातील मोठ्या नेत्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा २०१४ मध्ये मोदी आई हिराबा यांना भेटण्यासाठी गांधीनगरला गेले होते. आईचे आशीर्वाद घेण्याबरोबरच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचीदेखील भेट घेतली होती. त्याच दिवशी संध्याकाळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आदरातिथ्य केले होते. परंतु, २०१५ मध्ये ते आईच्या भेटीला जाऊ शकले नाहीत. त्याऐवजी १९६५ च्या युध्दाशी संबंधीत प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी आईला दिल्लीतील सात, रेसकोर्सवरील आपल्या घराचे दर्शन घडवले होते. ही छायाचित्रे सोशल मीडियावरदेखील पोस्ट करण्यात आली होती.

Narendra-Modi-1st