पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. दोन वर्षांत मोदी यांचा अमेरिकेचा हा चौथा दौरा असून काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करण्यासाठी त्यांना निमंत्रित करावे, असे आवाहन अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ७ आणि ८ जूनला वॉशिंग्टनला भेट देण्याची शक्यता आहे, असे एड रॉयस, इलियट एन्जेल, जॉर्ज होल्डिंग आणि अमी बेरा या काँग्रेसजनांनी लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
रॉयस हे परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत, तर एन्जेल हे उच्चपदस्थ सदस्य आहेत. होल्डिंग आणि बेरा हे उपाध्यक्ष आहेत. संरक्षण, मानवतावाद आणि आपत्कालीन मदत, अंतराळ सहकार्य, संवर्धन आदी क्षेत्रात दोन देशांमध्ये असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बाबत थेट मोदी यांचे भाष्य ऐकणे ही आपल्यासाठी चांगली संधी आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
या सर्व बाबींचा सारासार विचार करून मोदी यांना काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी निमंत्रित करावे, अशा प्रकारचे निमंत्रण दिल्यास मोदी ते स्वाकारतील याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळेच त्यांना निमंत्रित करण्याची विनंती आम्ही करीत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.
तथापि, व्हाइट हाऊस अथवा दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून या दौऱ्याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. निवडणूक, लोकशाही, कायद्याचे राज्य, धार्मिक अनेकतत्त्ववाद आदी मूल्यांवर अमेरिकेचे भारताशी संबंध आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला दोनदा भेट दिली, तर मोदी यांनीही अमेरिकेला दोनदा भेट दिली आहे.