पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्याच्या इन्स्टीट्यूटला भेट दिली. अहमदाबाद, हैदराबाद नंतर ते पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये आले. पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर तासभर चर्चा केली. सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी त्यांनी सिरमची कार्यपद्धती समजून घेत करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. दरम्यान, “करोना विषाणूच्या विरोधातील लढाईत शेजारी देशांसोबत अन्य देशांचीही मदत करणं आपलं कर्तव्य आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

“भारत लसीला केवळ उत्तम आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीही उत्तमच मानतो. करोना विषाणूच्या विरोधातील सामूहिक लढाईत आपल्या शेजारी देशांसोबतच अन्य देशांचीही मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करोना लसीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट दिली. मोदींनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्ही-डी लशीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. पंतप्रधान मोदींनी इथे स्वत: भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.

झायडस कॅडिलाला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले….

अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे, असं मोदींनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.