जनतेच्या तक्रारी, सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासन दरबारी मांडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या व्यासपीठावरुन शनिवारी ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. सरकारी  पोर्टलच्या दुसऱ्या वर्षीच्या निमित्ताने दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयमवर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोबाइल धारकांना सरकारच्या वेबसाइटशी संलग्नित करण्यासाठी एक नवीन अॅप देखील मोदींच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून परिसंवादानंतर मोदी जनतेला संबोधित करतील. तसेच यावेळी ते पोर्टलचा नियमित वापरकर्त्यांशी देखील संवाद साधतील. ‘आपले सरकार’ पोर्टल या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी या कार्यक्रमामध्ये सरकार आणि जनतेशी जोडणाऱ्या उपक्रमाच्या प्रतिसादावर भाष्य करतील. ‘आपले सरकार’ पोर्टलचा नियमित वापर करणारे तसेच  मत, प्रतिक्रिया आणि सूचना नोंदविणाऱ्या निवडक पोर्टल वापरकर्त्यांची मोदींना भेटण्यासाठीची प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली असल्याची माहिती देखील गौरव त्रिवेदी यांनी दिली. कार्यक्रामातील विविध  सत्रामध्ये  नवीन डिझाइन, कल्पना यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांचा समावेश असेल. तसेच पोर्टल संदर्भातील अनुभव आणि सुधारणा संबंधिच्या सूचनांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी या परिसंवादामध्ये उपस्थित असणार आहेत.