16 January 2019

News Flash

…म्हणून नेटीझन्सनी केले मोदींना ट्रोल

मोदींच्या व्यायामाच्या फोटोवर क्रिएटीव्हीटी दाखवत त्या फोटोंमध्ये बदल करुन विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच विराट कोहली याने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केले होते. यामध्ये त्यांनी अनेक व्यायामप्रकार करुन दाखवले. त्याचे व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले. त्यावरुन आता नेटीझन्सनी मोदींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मोदींनी करुन दाखवलेल्या वेगवगेळया व्यायामप्रकारांची नागरिकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. ते मोदींनी काल पूर्ण केले. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी हम फिट तो इंडिया फिट मोहिम सुरु केली होती. ज्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मोदींनी यामध्ये व्यायामप्रकारांबरोबरच प्राणायामचे काही प्रकारही करुन दाखवले. त्याचे मेमे तयार करुन ते व्हायरल करण्याचा प्रकार काहींनी केला आहे. तर ते ज्या बागेत व्यायामप्रकार करत आहेत त्या बागेच्या फोटोसोबत एका सार्वजनिक बागेचा फोटो जोडून सामान्यांसाठी अशी बाग आणि मोदींसाठी अशी असेही एकाने पोस्ट केले आहे. तर एका मोठ्या दगडावर पाठ टेकवून स्ट्रेचिंगचा व्यायाम करतानाचा मोदींच्या फोटोला एकाने ‘व्हॉट द हेल’ असे लिहीले आहे. तर हे स्ट्रेचिंग करताना मोदींनी हात जोडलेले असल्याने दुसऱ्याने अच्छे दिनसाठी प्रार्थना करताना…अशी पोस्ट केली आहे.

याशिवाय मोदींच्या व्यायामाच्या फोटोवर क्रिएटीव्हीटी दाखवत त्या फोटोंमध्ये बदल करुन विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. या बागेत असणाऱ्या झाडांमध्ये तसेच गवतावर मोदी व्यायामप्रकार आणि प्राणायाम करताना व्हिडियोमध्ये दिसत आहेत. हे फोटो मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आल्यानंतर लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांनी हे चॅलेंज दिलं आहे. याशिवाय त्यांनी देशातील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांनाही हे चॅलेंज दिलं आहे, ज्यांचं वय ४० पेक्षा अधिक आहे.

First Published on June 14, 2018 6:06 pm

Web Title: pm narendra modi trolled by netizens on social media on fitness challenge video