पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन सूर्यग्रहण पाहतानाचा आपला फोटो शेअर केला आणि लगेचच त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली. अनेकांनी यावर मीम करण्यासही सुरुवात केली. एका ट्विटर युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा फोटो मीमचा विषय झाला असल्याचं सांगितलं. यावर नरेंद्र मोदींनी उत्तर देत ट्विटरकरांना आश्चर्याचा धक्का दिला. नरेंद्र मोदी यांनी स्वागत आहे असं उत्तर देत बिनधास्त माझी थट्टा करा असं सांगितल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी तयारीही केली. पण, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले. इतर भारतीयांप्रमाणेच आपणही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो, पण दुर्दैवानं बघता आले नाही, असं म्हणत मोदींनी नाराजीही व्यक्त केली.

भारतातील अनेक शहरात हे सूर्यग्रहण दिसले. मात्र, ढगाळ वातावरण असल्यानं अनेक ठिकाणी लोकांचा हिरमोड झाला. हे सूर्यग्रहण बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उत्सुक होते. त्यांनी सूर्यग्रहण बघण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी ढगाळ वातावरण तयार झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्यग्रहण थेट बघता आले नाही. याबद्दल त्यांनी ट्विट करून खेद व्यक्त केला.

नरेंद्र मोदींनी ट्विटरला सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो शेअर केला. नरेंद्र मोदी यांनी फोटो ट्विट करताच अर्ध्या तासात फोटोला १७ हजार लाइक आणि चार हजार रिट्विट मिळाले.