भारतात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू लागलेली असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अनेक देशांनी भारताता विविध पद्धतीने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामध्ये रशियाचा देखील समावेश असून स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले आहेत. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी ट्विटर हँडलवरून व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. “आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं. आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, दोन्ही देशांमधल्या सहकार्यावर देखील या कॉलमध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी देखील चर्चा केली. यात प्रामुख्याने अंतराळ संशोधन आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्राविषयी देखील चर्चा झाली. या संकटाविरुद्धच्या लढ्यामध्ये स्पुटनिक व्ही लसीबाबत झालेलं आमचं सहकार्य नक्कीच मानवजातीला मदत करेल. रशिया आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये मंत्रीस्तरावर चर्चा सुरू करण्यावर सहमती केली आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

हे खरं वसुधैव कुटुंबकम्! अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांचा भारताला मदतीसाठी पुढाकार!

भारतात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला करोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.