भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत असून रविवारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्यफेरीत धडक मारलीय. तीन वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने अनपेक्षित धक्का देत ही कामगिरी केलीय. या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघांवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान मोदींनीही या साऱ्या घटनांची अमृत मोहोत्सवाशी सांगड घालत देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दल दोन ट्विट केलेत.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवात दमदार झाल्याचं अधोरेखित करणारे दोन ट्विट मोदींनी केलेत. “भारत ऑगस्ट महिन्यात प्रवेश करत असून अमृत मोहोत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक भारतीयाला स्पर्श करणाऱ्या (अभिमान वाटणाऱ्या) घटना घडत आहेत. विक्रमी लसीकरणाबरोबरच सर्वाधिक जीएसटी संकलनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे संकेत दिसत आहेत,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

नक्की पाहा हे १० फोटो >> एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केलाय. “केवळ पी. व्ही. सिंधूनेच पदक जिंकलंय असं नाही तर भारतीय आणि महिला हॉकी संघानेही दमदार कामगिरी केलीय. मला आशा आहे की १३० कोटी भारतीय आपलं काम कष्टाने, मन लावून करतील आणि भारत हा अमृत मोहत्सव साजरा करताना यशाच्या नव्या शिखरांव पोहचेल,” असं मोदींनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय.

नक्की वाचा >> Olympics 2020 Hockey : भारत सरकारने Meme शेअर करत केलं भारतीय महिलांचं अभिनंदन

भारतीय संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम करुन दाखवलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने नमवून उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय महिलांनी केलेल्या या कामगिरीनंतर सोशल नेटवर्किंगवरही मोठ्याप्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून ट्विटरवरील टॉप ट्रेण्डींग विषयांपैकी अनेक हॅशटॅग हे याच सामन्यासंदर्भातील आहेत.