करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेलं लॉकडाउन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असं दिसून येतं आहे. ही चिंतेची बाब आहे करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केलं आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यू ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर खासगी वाहनांमधून येणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढलेली दिसून आली. लोक काही अत्यावश्यक काम असल्याशिवायही बाहेर पडल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही असं चित्र दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन लॉकडाउन गांभीर्याने घ्या असं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ झाली आहे. तर आणखी एकाचा बळी गेल्याही बातमी समोर आली आहे. अशात महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाऊन जाहीर केला आहे. इतर राज्यांमध्येही लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सारं काही बंद आहे, तरीही लोक गर्दी करत आहेत. आता लोकांनी जर ऐकलं नाही तर कारवाई करावी लागेल असाही इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.