पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एक आठवड्यांच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेत जंगी तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेतील हस्टन शहरातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यासाठी तेथील रस्त्यांवर मोदींच्या स्वागतासाठी मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्यासंबंधी माहिती देताना हस्टन येथील भारतीयांकडून आयोजित कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचं सांगितलं आहे. २२ सप्टेंबरला नरेंद्र मोदी हस्टन शहरात असणार आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 50 हजाराहून जास्त लोकांनी नोंदणी केली आहे.

नरेंद्र मोदींचा दौरा २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. तसंच याशिवाय न्यूयॉर्क येथे अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते २७ सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत अमेरिकेत असतील,” असं रवीश कुमार यांनी सांगितलं होतं. २७ सप्टेंबरला नरेंद्र मोदी अमेरिकेच्या संसदेत भाषण देतील. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमनच नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींच्या नंतर काही वेळाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील बोलणार आहेत.