बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला जाण्यासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला. नरेंद्र मोदींचे विशेष विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले. आताही काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. पाकिस्तानकडून भारताला युद्धाचे इशारे दिले जात आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची पाकिस्तानने परवानगी दिली.

२६ फेब्रुवारीला बालाकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यात पाकिस्तानचेच दुप्पट नुकसान होत होते. पंतप्रधान मोदी जी ७ परिषदेसाठी फ्रान्सला चालले असून त्या दरम्यान ते तीन देशांना भेटी देणार आहेत. आज ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील.

उद्या २३ ऑगस्टला मोदी यूएईसाठी रवाना होतील. अबु धाबीच्या क्राऊन प्रिन्स बरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील. २४ ऑगस्टला ते बहरीनला जातील. तिथे ते पंतप्रधान शेख खलिफा बीन सलमान अल खलिफा यांच्याबरोबर चर्चा करतील. त्यानंतर मोदी जी ७ परिषदेसाठी पुन्हा फ्रान्सला जातील. २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान ते फ्रान्समध्ये असतील. त्यावेळी मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबरही चर्चा होणार आहे.