पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर या दहा राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल. करोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो,” असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

“देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळालं. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल,” असं मोदी यावेळी म्हणाले.

चाचण्यांची संख्या वाढली

देशात दररोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढली असून ती आता ७ लाख प्रति दिवसांवर पोहोचली आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांची ओळख पटवण्यासाठी जी मदत मिळत आहे त्यामुळे बदलणारी परिस्थिती आज आपण पाहत आहोत. आपल्या करोनामुळे होणार मृत्यूदरही जगाच्या तुलनेत पूर्वीपासूनच कमी होता आणि तो आता आणखी कमी होत आहे. अॅक्टिव्ह केसेसमध्येही घट होत आणि तर रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून रुग्णांमध्येही आत्मविश्वास वाढत असल्याचं ते म्हणाले.