पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या मार्गिकेचा मुद्दा मोदींकडून चीनच्या अध्यक्षांकडे उपस्थित

चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून टाकली जात असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी बोलताना उपस्थित केला आहे. दोन्ही देशांनी इतरांच्या सामरिक हितांबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

दहशतवादाविरोधातील लढाई ही राजकीय बाबींवर आधारित असता कामा नये असे सांगून मोदी म्हणाले की, एकमेकांच्या आशाआकांक्षा, चिंता व धोरणात्मक हितसंबंध जपले गेले तरच द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतात. क्षी जिनपिंग यांच्याबरोबर मोदी यांची जी २० बैठकीच्या अगोदर बैठक झाली त्यात मोदी यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका पाकव्याप्त काश्मीरमधून नेली जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली. मार्गिकेत, रेल्वे, रस्ते, पाइपलाइन, तेल व वायू वाहतूक यांचा समावेश आहे. पाकिस्तानातील ग्वादर बंदरातून पाकव्याप्त काश्मीरमार्गे शिनजियांगमध्ये मालाची वाहतूक केली जाणार आहे. दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता किंवा नाही याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मोदी व क्षी जिनपिंग यांच्यात सुमारे ३० मिनिटे चर्चा झाली. सीमेवर शांतता राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे मोदी यांनी सांगितले तसेच काही बाबींचे नकारात्मक आकलन हे हानिकारक ठरत असल्याचे स्पष्ट केले. किरगीझस्तानातील चीनच्या दूतावासात करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्याचा मोदी यांनी निषेध केला. दहशतवादाला आपला प्रतिसाद हा राजकीय बाबींशी निगडित नसावा असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

भारताबरोबर दृढ केलेले द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्याचीच चीनची इच्छा आहे असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटीत सांगितले. दोन्ही देशात अनेक प्रश्नांवर मतभेद असताना दोन्ही नेत्यांची जी २० परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. चीनने भारताबरोबरचे संबंध मोठय़ा मेहनतीने वाढवले आहेत व ते आणखी मजबूत करण्याची इच्छा असल्याचे क्षी जिनपिंग यांनी अध्र्या तासाच्या बैठकीत व्यक्त केली. तीन महिन्यात मोदी व जिनपिंग यांची ही दुसरी भेट होती. पाकिस्तानच्या काही दहशतवादी संघटनांना संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत टाकण्याला चीनने केलेला विरोध तसेच अणुपुरवठादार देशांच्या गटात भारताला स्थान मिळण्यास केलेला विरोध.

चीन व पाकिस्तान मार्गिकेचे पाकव्याप्त काश्मीरमधून होत असलेले बांधकाम हा सुद्धा वादाचा विषय होता. दोन्ही नेत्यांची भेट शांघाय कार्पोरेशन ऑर्गनायझेशन बैठकीच्या निमित्ताने जून महिन्यात ताश्कंद येथे झाली होती. पुढील महिन्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांची बैठक गोव्यात होत आहे. जैश ए महंमदचा प्रमुख मसूद अझर याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत संयुक्त राष्ट्रांनी समाविष्ट करावे यासाठी भारताने केलेले प्रयत्न चीनने हाणून पाडले होते. भारत-अमेरिका यांच्यातील वाढत्या संबंधांनाही चीनचा विरोध आहे. अलीकडेच दोन्ही देशात लिमोआ करार झाल्याने चीनने कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

 

दहशतवादाच्या मुकाबल्यात ब्रिक्सदेशांनी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज – मोदी

हांगझाऊ : ‘ब्रिक्स’ देशांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या बैठकीत व्यक्त केले. दहशतवाद पसरवणाऱ्यांना वेगळे पाडले पाहिजे असे त्यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता सांगितले. ब्रिक्स देशाच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की दहशतवादी मग ते दक्षिण आशियातील असोत की आणखी कुठले, त्यांच्याकडे त्यांचे स्वत:चे शस्त्र कारखाने नाहीत. याचा अर्थ कुणीतरी त्यांना त्यासाठी निधी पुरवते, ब्रिक्स देशांनी मात्र दहशतवादाविरोधात समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे. दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडले पाहिजे. चीनचा मित्र देश असलेल्या पाकिस्तानवर मोदी यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी आक्रमकपणे दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्सच्या मंचावर मांडला, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. आठव्या वार्षिक बैठकीपूर्वी ब्रिक्स देशात अनौपचारिक चर्चा महत्त्वाची होती.

ब्रिक्स देशांचा गट हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक प्रभावी आवाज असून या गटाने जागतिक उद्दिष्ट कार्यक्रमाला आकार देण्यात जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या बैठकीत बोलताना सांगितले. ब्रिक्स देशांची आठवी वार्षिक बैठक गोव्यात १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होत असून त्या पाश्र्वभूमीवर येथे बैठक झाली. त्यात मोदी यांनी सांगितले, की ब्रिक्स देशांच्या गटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व असून आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ठरवण्यासाठी या गटाने पुढाकार घेतला पाहिजे, त्यामुळे विकसनशील देशांना त्यांची उद्दिष्टे साध्य करता येतील. प्रतिसादशील, सर्वसमावेशक व सामूहिक उत्तरे शोधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जी २० देशांच्या गटांच्या बैठकीतही या मुद्दय़ाला महत्त्व देण्यात येत आहे. ब्रिक्स देशांच्या बैठकीस ब्राझीलचे अध्यक्ष मायकेल टेमर, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा उपस्थित होते. पुढील बैठकीत संपर्क पातळीवर प्रयत्नांचा भाग म्हणून नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार व थायलंड यांना निमंत्रित केले जाणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.