पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंरतु त्यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी एक ट्विट करत त्यात इंम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचं असं म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महत्त्वाची घोषणा करणार का? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अमित शाह यांनी ट्विटरवर एक मेसेज शेअर केला आहे. तसंच त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार असल्याचा एक फोटो शेअर करत महत्त्वाचे असं म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पंतप्रधानांचं संबोधन ऐकावं,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कुठल्या विषयावर जनतेशी संवाद साधणार याबद्दल कुतूहल आहे. अनलॉक २ संदर्भात सोमवारी रात्रीच मार्गदर्शकतत्वे जारी झाली आहेत. करोना व्हायरसच्या या संकटकाळात मोदी सहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. काल रात्री टि्वटरवरुन पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या संबोधनाची माहिती दिली. यापूर्वी पाच वेळा मोदींनी देशाला संबोधित केले होते. काल रात्रीच केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदीचा निर्णय जाहीर केला. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. एकूणच चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय भूमिका जाहीर करतात याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.