एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांची तुलना जादूगार पी.सी. सरकार यांच्याशी केली आहे. पी. सी. सरकार हे देशातले आणि जगातले प्रसिद्ध जादूगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये आठवड्याभरात ८.५ लाख सार्वजनिक टॉयलेट्स उभारल्याची घोषणा म्हणजे या जादूचाच एक भाग आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जादूगार पी. सी. सरकार यांच्या जादूच्या प्रयोगांशी स्पर्धा करत आहेत असेच देशात चित्र आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टोपीतून ससा बाहेर काढून दाखवण्याची जादू दाखवली तर मुळीच आश्चर्य वाटायला नको, असा टोमणाही ओवेसी यांनी मारला आहे. त्यांच्या जादूच्या प्रयोगांना टीव्हीवर चांगला टीआरपीही मिळतो हे सांगायलाही ओवेसी विसरलेले नाहीत. आपल्या वक्तव्यात त्यांनी कठुआ या ठिकाणी झालेल्या ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा आणि बलात्कार व हत्येच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. या घटनेमुळे सगळा देश हादरल्याचे त्यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एकीकडे पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी घोषणा करतात. स्त्री शक्ती, महिला सबलीकरणाचे नारे देतात आणि दुसरीकडे अशा घटनांवर साधे भाष्यही करत नाहीत. ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? जम्मू काश्मीरमध्ये काय चालले आहे याकडे त्यांचे लक्ष आहे का? उत्तर प्रदेशात तर भाजपाचे मुख्यमंत्री निष्पाप लोकांना एन्काऊंटरच्या नावाखाली ठार करत आहेत आणि त्याची शेखी मिरवत आहेत असाही आरोप ओवेसी यांनी केला.