पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवशी ‘स्पेशल गिफ्ट’ दिलं. मोदींचे हे स्पेशल गिफ्ट बघून प्रणव मुखर्जींही भावूक झाले. मोदींनी प्रणव मुखर्जींना एक पत्र पाठवले होते. मोदींचे हे पत्र प्रणव मुखर्जींनी गुरुवारी ट्विटरवर शेअर केले.

प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैरोजी संपला. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रणव मुखर्जींना एक पत्र पाठवले. या पत्रात मोदींनी प्रणवदांचे भरभरुन कौतुक केले. ‘आज तुमचा राष्ट्रपती भवनातील शेवटचा दिवस आहे, गेल्या पाच वर्षात तुम्ही देशासाठी दिलेले योगदान मी कधीही विसरु शकणार नाही. साधेपणा, तुमची तत्व आणि नेतृत्वगूणांनी मला नेहमीच प्रेरणा दिली’ असे सांगत मोदींनी पत्राची सुरुवात केली.

‘तीन वर्षांपूर्वी मी गुजरातमधून थेट दिल्लीत आलो होतो. माझ्यासाठी हे सगळं आव्हानात्मक होतं. पण या कठीण काळात तुम्ही माझी पित्यासारखी आणि एक मार्गदर्शक म्हणून साथ दिली’ असे मोदींनी पत्रात म्हटले आहे. ‘पराष्ट्र व्यवहार आणि देशांतर्गत सुरक्षा अशा विविध विषयांवरील तुमचा सखोल अभ्यास याचे मला नेहमीच आश्चर्य वाटायचे’ असे मोदींनी म्हटले आहे. ‘आपण दोघेही विभिन्न विचारधारेतून आलो होतो. मला एका राज्यातील प्रशासकीय कामकाजाचा अनुभव होता. तर तुम्ही एका राष्ट्रीय पक्षातील ज्येष्ठ नेते आहात आणि राजकारणात अनेक दशकांपासून कार्यरत आहात’ असे त्यांनी सांगितले. प्रणव मुखर्जींनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी केलेल्या फोनचा उल्लेखही मोदींनी पत्रात केला आहे. ‘प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही प्रकृतीची काळजी घेताय ना’ अशी विचारपूस प्रणवदांनी केल्याचे मोदींनी म्हटले आहे.