पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन नोटा बदलून घेण्यासाठी सकाळी गांधीनगरमधील बँकेत पोहोचल्या. हिराबेन त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या रायसेन शाखेत दाखल झाल्या होत्या. यावेळी हिराबेन यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन गांधीनगरमध्ये राहतात. मंगळवारी सकाळी मोदींच्या आई हिराबेन गांधीनगरमधील रायसेन परिसरातील बँकेच्या शाखेत पोहोचल्या. यावेळी हिराबेन यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणल्या होत्या. हिराबेन यांना १० रुपयांची दोन बंडले देण्यात आली. याशिवाय दोन हजार रुपयाची नवी कोरी नोटदेखील हिराबेन यांना बँकेकडून देण्यात आली.

कोणतीही सवलत न घेता हिराबेन बँकेत आल्या होत्या. अतिशय वयोवृद्ध असणाऱ्या हिराबेन मोदींना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आतापर्यंत भाजपचा एकही मोठा नेता नोटा बदलून घेण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभा राहिलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसालाच मनस्ताप होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र आता मोदींच्या वयोवृद्ध आईच बँकेच्या रांगेत सर्वसामन्य माणसांसारख्या बँकेत उभ्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या रांगांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ताटकळत उभे राहावे लागते आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बँकेमध्ये वेगळी रांग असेल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.