पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी विरोधकांमुळे तर कधी त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे चर्चेत असतात. नुकतेच मोदी अंदमान-निकोबार द्विपसमूहावर काही योजनांची सुरुवात करण्यासाठी गेले होते. त्यासाठी ते शनिवारी संध्याकाळी पोर्ट ब्लेयर येथे पोहोचले. यावेळी मोदींचा एक नवीन लूक समोर आला. मोदींनी यावेळी लुंगी घातली होती. हा दक्षिण भारतीयांचा पारंपरिक पेहराव असून मल्याळम भाषिक त्याला मुंडू असे म्हणतात. मोदींनी आपल्या ऑफीशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला हा फोटो शेअर केला. त्यावर त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. आपल्या या फोटोखाली मोदी लिहीतात, नैसर्गिकदृष्ट्या सुंदर असलेल्या पोर्टब्लेयरची सकाळ…सुर्योदय आणि पारंपरिक पोषाख. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली त्या नेत्यांबाबत विचार करताना.

मोदींचा हा फोटो अतिशय कमी कालावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा फोटो लाईक करत त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यामध्ये युजर्सनी मोदींचे कौतुक केल्याचे दिसत आहे. अनेकांनी तुमच्या जीवनातून आम्हाला प्रेरणा मिळते असेही म्हटले आहे. निकोबारमधील लोक त्सुनामीतून सावरल्याने या लोकांचे मोदींनी आभार मानले. अंदमानमधील जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. देशाचा कोणताही कोपरा हा विकासापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन मोदींनी दिले. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोला १६ लाखांहून अधिक लाईक आले आहेत तर या पोस्टवर १२ हजारांहून जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.