पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हवाई प्रवासासाठी बनवण्यात येत असलेली दोन विशेष विमाने पुढच्यावर्षी जूनपर्यंत भारताला मिळू शकतात. एअर इंडिया ऐवजी इंडियन एअर फोर्सकडे या दोन्ही विमानांचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. सरकार सध्या या प्रस्तावावर विचार करत आहे. साऊथ ब्लॉकमधील सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी वापरण्यात येत असलेल्या एअर फोर्स वनच्या धर्तीवर या विमानांची निर्मिती करण्यात येत आहे.

कामकाजाच्या सुलभतेसह सुरक्षेचा दृष्टीने या विमानाची रचना करण्यात आली आहे. बोईंगच्या डलास येथील प्रकल्प स्थळावर 777-300ER या विमानांची बांधणी सुरु आहे. पुढच्यावर्षी जून २०२० पर्यंत या विमानांचे भारतात लँडिंग होईल. मोदींसाठी बनवण्यात येत असलेली ही दोन्ही विमाने मिसाइल डिफेन्स सिस्टिमने सुसज्ज असतील. शत्रूचा क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यात सक्षम असतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे बोईंग 747-200B जितके सुरक्षित आहे तितकेच हे विमान सुद्धा सुरक्षित असेल.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांव्यतिरिक्त कोणालाही या विमानाचा वापर करता येणार नाही. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचा वापर करतात. त्यांच्या छोटया दौऱ्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या व्हीव्हीआयपी ताफ्यातील विमानांचा वापर केला जातो. बोईंग ७७७ हे विशेष सुरक्षा प्रणालीने सज्ज असलेले भारतातील पहिले विमान ठरणार आहे.

शत्रूचे रडार जॅम करण्यासह क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यास हे विमान सक्षम असेल. नव्या विमानातील मिसाइल डिफेन्स सिस्टिम एअर इंडियाऐवजी इंडियन एअर फोर्सच्या नियंत्रणाखाली रहाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जबाबदारीत बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आयएएफकडे या विमानाचे नियंत्रण गेले तर एअर इंडिया वन ऐवजी एअर फोर्स वन म्हणून हे विमान ओळखले जाईल.

मिसाइल डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय
मिसाइल डिफेन्स सिस्टिम म्हणजे शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रापासून रक्षण करणारी यंत्रणा. अमेरिका, रशिया, तैवान, भारत, चीन आणि इस्रायलने अशी सिस्टिम विकसित केली आहे. एअर फोर्स वनच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राचा मार्ग बदलण्याची यंत्रणा डिफेन्स सिस्टिममध्ये असेल.