देशातील समस्या जुन्या आहेत. त्यावरील उपायही काँग्रेसला माहिती होते. पण समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही त्यांच्याकडून झालीच नाही. कार्यवाही केली असती, तर आमच्या सरकारपुढचे प्रश्न कमी झाले असते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर हल्ला चढविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर दिले. आभार प्रस्तावात कोणतीही सुधारणा न सुचवता तो मंजूर करून संसदेच्या परंपरेचे पालन करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी सभागृहात केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्द्यावर काँग्रेसच्या राज्यसभेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा समाचार घेताना नरेंद्र मोदी यांनी काही ज्येष्ठ सदस्यांना आता भूलेबिसरे गीत आठवायला लागल्याचे सांगितले. देशातील अशिक्षितांबद्दल काँग्रेसला इतकी कणव असेल, तर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत त्यांनी किमान ३० टक्के अशिक्षितांना पक्षाचे तिकीट द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही कौशल्यविकास कार्यक्रम होता. पण त्यासाठी नुसत्या वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यापैकी काही समित्यांच्या वर्षानुवर्षे बैठकाच होत नव्हत्या. शेवटी २०१३ मध्ये या सगळ्या समित्या बरखास्त करण्यात आल्या. आम्ही सुरू केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाशी तुलना करून काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनधन योजनेतील त्रुटींवरून विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा समाचार घेताना ते म्हणाले, आता तुम्ही सरकारच्या योजनेतील त्रुटी मायक्रोस्कोप घेऊन हुडकत आहात. पण सत्तेत असताना दुर्बिण घेऊन काम केले असते, तर आज ही वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. देशातील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प दहावर्षांपासून प्रलंबित होते. पण आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला. त्याचबरोबर विविध पर्यावरणविषयक मंजुऱ्यांचे अधिकार राज्य सरकारांनाच देण्यात आले. त्यामुळे विविध प्रकल्पांचे काम गतीने सुरू झाले आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.