पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या विशेष संयुक्त अधिवेशनात बुधवारी केलेल्या भाषणामुळे काँग्रेसजन आणि टीकाकार प्रभावित झाले आहेत.
आपल्या नर्मविनोदी शैलीत करण्यात आलेल्या भाषणामुळे आपल्याशी इतके जवळचे संबंध का प्रस्थापित झाले आहेत ते खरोखरच ध्वनित होते, असे सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष बॉब कॉर्कर यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात राजकीय, रणनीती आणि आर्थिक संबंध नेहमीपेक्षाही अधिक उत्तम झाले आहेत, ते भविष्यात यापेक्षाही अधिक उंची गाठतील याची आम्हाला जाणीव आहे, असे कॉर्कर यांनी म्हटले आहे.
सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे सदस्य बेन कार्डिन गेल्या दोन आठवडय़ांपासून भारतातील मानवी हक्क आणि गुलामगिरीचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, मात्र बुधवारी केलेल्या भाषणामुळे मोदी यांनी काँग्रेसमध्ये अनेक मित्र जोडले आहेत, असे कार्डिन म्हणाले. भारत आणि अमेरिकेने जगाच्या कल्याणासाठी एकत्र काम करावे असे मोदींनी आवाहन केले त्याचा संदर्भ देताना कार्डिन म्हणाले की, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे.
मोदी यांच्या पाऊण तासाच्या भाषणाला काँग्रेसजनांनी अनेकदा उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भारत आणि अमेरिकेतील संबंध जगातील शांतता आणि स्वातंत्र्यासाठी किती आवश्यक आहे ते सांगितले त्याला अध्यक्ष पॉल रायन यांनीही दाद दिली.
मोदी यांच्या भेटीमुळे ठरविलेल्या कार्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल आणि भारत हा आशियातील अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असेल, असे इलियट एन्जेल या काँग्रेसजनांनी म्हटले आहे.