पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवडय़ात अमेरिकेला भेट देणार आहेत. मोदींच्या भेटीने द्विपक्षीय संबंध दृढ होतील असा विश्वास अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.
मोदींच्या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करतील तसेच व्हाईट हाऊसमध्ये मोदींना मेजवानी दिली जाणार आहे. २०१४ पासून मोदी व बराक ओबामा यांच्यात सहा भेटी झाल्या आहेत. तसेच दूरध्वनीवरून अनेकदा चर्चा झाल्याचे पाहता दोन देशांदरम्यान संबंध दृढ असल्याचे हे द्योतक असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. मोदींच्या दौऱ्यात प्रामुख्याने वातावरण बदलाचा मुद्दा, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षाविषयक बाबी तसेच आशिया-प्रशांत विभागात राजनैतिक संबंध भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी आर्थिक सहकार्य कसे वाढवता येईल याबाबत विचार केला जाण्याची अपेक्षा आहे.
मोदींचा दौरा संरक्षण, वातावरण, स्वच्छ उर्जा, सुरक्षा , सायबर धोके या विषयात चर्चेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा माजी उपसहाय्यक परराष्ट्र मंत्री अलयसा आयरस यांनी व्यक्त केली. २०१० ते १३ या कालावधीत प्रामुख्याने दक्षिण आशियाई विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य मंडळावर भारताच्या प्रतिनिधित्वावर ओबामा शिक्कामोर्तब करू शकतात असे त्यांनी सांगितले. याद्वारे भारताच्या आर्थिक प्रगतीत अमेरिकेची सहकार्य करण्याची इच्छा आहे असा संदेश देऊन ओबामांची भारताकडूनही तशी सहकार्याची अपेक्षा आहे.