आज नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्याप्रकारे या गोष्टींना थांबवलं जात आहे ते आधी कधीच झालेलं नाही. नव्या भारतात थकणं आणि थांबण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधत आपल्या सरकारने केलेल्या कामांची तसंच मिळवलेल्या यशाची माहिती दिली. “आजकाल नेत्यांना आपण दिलेलं आश्वासन विसरण्यात जास्त आनंद मिळतो. पण मी त्यातला नाही. मी आश्वासनांची आठवण करुन देतो”, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. यामुळेच जनतेने आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी दिली आहे. फक्त सरकार चालवण्यासाठी नाही तर नवा भारत निर्माण करण्यासाठी ही संधी दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलx.

“नवं सरकार येऊन जास्त दिवस झालेले नाहीत, फक्त ७५ दिवस झालेले आहेत. १०० दिवसही पूर्ण झालेले नाहीत. या काळात सेलिब्रेशन सुरु असतं. आम्ही मात्र त्या भानगडीत पडलेलो नाही. योग्य धोरणं आणि दिशेने जात आम्ही एकामागोमाग एक मोठे निर्णय घेतले”, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

यावेळी नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही भाष्य केलं. “तिहेरी तलाक एक अमानवीय कृत्य होतं. पण आम्ही ते संपवून टाकलं. महिलेचा सन्मान करणं गरजेचं आहे. तिहेरी तलाक रद्द केल्यामुळे मिळालेले करोडो महिलांचे आशिर्वाद भारताचं भलं कऱणार आहेत. नव्या भारतात मुस्लिम महिलांसोबत होणारा अन्याय कसा स्विकार केला असता”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी उपस्थित भारतीयांनी मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर नरेंद्र मोदींनी मोदी है तो मुमकीन है मुळे नाही, तर देशाती जनतेने मतदान दिल्यानेच हे शक्य झालं असं सांगितलं.


“गेल्या पाच वर्षात भारतात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. फुटबॉल प्रेमींच्या देशात मी आलो आहे त्यामुळे गोलचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत असे गोल (ध्येय) ठेवले आहेत जे आधी अशक्य मानले जात होते. पण आम्ही अनेक गोष्टी पूर्ण करुन दाखवल्या आहेत. ठरलेल्या काळात अपेक्षेपेक्षा जास्त बँक खाती भारतात सुरु कऱण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

पुढे बोलताना सांगितलं की, “सर्वात मोठी आरोग्य योजना भारतात आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोची एकूण लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त या योजनेचे लाभार्थी आहेत”.