माजी पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझीदेखील हत्या होईल असा खळबळजनक दावा करत गोंधळ उडवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना आपला मृत्यू व्हावा असं वाटत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारित येतं. अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सर्व अधिकार राज्य सरकारकडे दिले जावेत अशी मागणी केली आहे.

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यासोबत ट्विटरवर झालेल्या चर्चेत अरविंद केजरीवाल यांनी लिहिलं की, ‘विजयजी, माझा खासगी सुरक्षा अधिकारी नाही तर नरेंद्र मोदींना माझी हत्या व्हावी असं वाटत आहे’.

अरविंद केजरीवाल यांनी विजय गोयल यांच्या ट्विटवर ही प्रतिक्रिया दिली होती. ‘आपल्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यावर संशय घेत तुम्ही दिल्ली पोलिसांच नाव खऱाब केलं आहे. तुम्हीच तुमचा खासगी सुरक्षा अधिकार निवडणे जास्त योग्य ठरेल. तुम्हाला काही हवं असल्यास कळवा. दिर्घायुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’, असं ट्विट विजय गोयल यांनी केलं होतं.

याआधी पंजाबमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी इंदिरा गांधींप्रमाणे खासगी सुरक्षा अधिकाऱ्याकडून आपली हत्या होईल असा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या या दाव्यामुळे वाद निर्माण झाला होता. दिल्ली भाजपाने पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांचा सुरक्षा काढून घेण्यास सांगितलं होतं. दिल्ली भाजपा प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांना माफी मागण्यास सांगा असं सांगितलं होतं.