‘अण्विक शस्त्रे पहिल्यांदा डागणार नाही’ हेच भारताचे धोरण असून, जागतिक शांततेसाठी आणि अण्वस्त्रमुक्त जग तयार करण्यासाठी सर्वच देशांनी या धोरणाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर परिषद भरविणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सांगितले.
केवळ एकाच देशाने ‘अण्विक शस्त्रे पहिल्यांदा डागणार नाही’ या धोरणाचा वापर करणे महत्त्वाचे नाही, तर जगभरातील सर्वच देशांनी या धोरणासाठी पुढाकारा घ्यावा. त्यासाठी जागतिक स्तरावर विशेष रचना करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
नवी दिल्लीत झालेल्या ‘अण्वस्त्रमुक्त जग : संकल्पना ते वास्तव’ या विषयावर सुरू असलेल्या परिसंवादात पंतप्रधान बोलत होते. ‘‘जगभरातील अनेक देशांची अण्वस्त्रांच्या वापराबाबत वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे जागतिक परिषद भरवून अनेक देशांच्या मतांबाबत चर्चा करता येईल,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले.
अण्वस्त्रे वापरावर बंदी आणण्यासाठी काय गरजेचे आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. अण्विक धोके कमी करण्यासाठी कशाची गरज आहे, यावर प्रकाशझोत टाकला पाहिजे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ‘‘जर सर्वच देशांनी अण्वस्त्रे वापरणार नाही, अशी भूमिका घेतल्यास ‘अण्विक शस्त्रे पहिल्यांदा डागणार नाही’ या धोरणाचा अवलंब करण्यासाठी भारत तात्काळ पावले उचलेल,’’ असे पंतप्रधान म्हणाले.