उद्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून करणाऱ्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक मंदी आणि रोजगाराच्या संकटाविषयीही भाष्य करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


काँग्रेस नेते आनंद शर्मा एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. ते म्हणाले, नोटाबंदीनंतर देशात आलेली आर्थिक मंदी आणि रोजगाराचे संकट हे विषय देशाच्या तरुणांच्या भविष्याशी निगडीत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बोलायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ३० जुलैच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात जनतेला स्वातंत्र्यदिनासाठीच्या भाषणासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी मोदींना हे आवाहन केले आहे.

“स्वातंत्र्यदिनादिवशी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना मी १२५ कोटी देशवासीयांचा प्रतिनिधी, आवाज म्हणून उभा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही या भाषणासाठी तुमच्या कल्पना पाठवाव्यात” असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मधून केले होते. या सूचना सर्वांसाठी व्यासपीठ असणाऱ्या नरेंद्र मोदी अॅपवर पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. याद्वारे जनतेच्या स्वप्नांना आवाज दिला जाणार असून यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सूचना यायला हव्यात असे मोदींनी म्हटले होते.

नोटाबंदीनंतर देशात अनेक क्षेत्रात मंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत होते. यामुळे छोट्या उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी रोजगाराच्या समस्याही निर्माण झाल्या होत्या. ही बाब जनतेच्या दृष्टीने महत्वाची असल्याने याचा उल्लेख राष्ट्राला उद्देशातून होणाऱ्या भाषणात व्हायला हवा अशी भुमिका काँग्रेसने मांडली आहे.