जम्मू क्षेत्रातील बनिहाल ते काश्मीर खोऱ्यातील काझीगंदला जोडणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी हिरवा कंदील दाखविला. श्रीनगरपासून १२५ कि.मी. अंतरावर नवे स्थानक बांधण्यात आले असून ते फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आले होते. सदर रेल्वे ११ कि.मी. लांबीच्या पीर पांचाळ क्षेत्रातील बोगद्यातून जाणार आहे. शालेय विद्यार्थी आणि इरकॉन व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी आठ डब्यांची ही गाडी केवळ २५ मिनिटांत काझीगंद येथे पोहोचली. बनिहाल-काझीगंद मार्गावर ११ कि.मी. लांबीचा बोगदा असून तो देशातील सर्वात मोठा बोगदा आहे आणि त्यामुळे ३५ किमी.चे अंतर केवळ १८ कि.मी. झाले आहे. या प्रकल्पाचा खर्च १६९१ कोटी रुपये इतका आहे.