पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्ययावत संपर्क तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असून, त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना फेसबुक पेज आणि टि्वटर खाते उघडण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे नवीन मंत्र्यांना मायक्रोब्लॉगिंग साईट्स आणि सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती अशा प्रकारच्या सार्वजनिक मंचावर टाकण्यास सांगण्यात आले आहे, ज्यायोगे जनतेच्या सतत संपर्कात राहता येईल. त्याचप्रमाणे लोकांबरोबर चर्चा करता येऊन, त्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त करता येतील आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सल्ल्यांचा समावेश उपक्रमात करता येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रचारादरम्यान जनसंपर्क आणि डिजीटल मीडीयाचा करण्यात आलेला वापर प्रशासनाचा कारभार चालविण्यासाठीसुद्धा करण्यात येणार आहे… लोकांमध्ये जाऊन जनतेशी संपर्क साधणे ही पंतप्रधानांसाठी महत्वाची बाब असून, यात सोशल मीडीया हे महत्वपूर्ण साधन असणार आहे. याआधीच नवीन पंतप्रधानांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधण्यासाठी टि्वटर आणि फेसबुकचा वापर करण्यास सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षापासून मोदी टि्वटरवर सक्रिय आहेत. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि अरुण जेटलीसारख्या जेष्ठ कॅबिनेट मंत्र्यांचेसुद्धा टि्वटर खाते आहे. नरेंद्र मोदींच्या मते भाजपला एव्हढ्या मोठ्याप्रमाणावर यश मिळण्यात सोशल मीडियाची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
टि्वटरवरील नरेंद्र मोदींच्या @narendramodi या वैयक्तिक खात्याबरोबरच आता त्यांचे पंतप्रधानपदाचे @PMOIndia हे अधिकृत खाते देखील आहे. त्यांचे वैयक्तिक टि्वटर खाते हिरेन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमधून सांभाळले जाते, तर त्यांच्या @PMOIndia खात्याची जबाबदारी पंतप्रधान कार्यालयातून सांभाळली जाते. दोन्ही खात्यांवर एकत्रितपणे सहा दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. टि्वटरवरील त्यांचे वैयक्तिक खाते हे एक राजकीय नोता म्हणून खासगी प्रकारातील आहे, तर पंतप्रधानपदाचे खाते हे कार्यालयीन कामासाठी आहे.
शपथग्रहण सोहळ्यानंतर मोदी यांनी आपल्या पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर (pmindia.nic.in) काही क्षणात बदल घडवून आणला. ‘आपल्यातील थेट संपर्काचे महत्त्वाचे माध्यम म्हणून मी या वेबसाईटकडे पाहतो’ असा संदेश त्यांच्या वेबसाईटवर झळकत होता.