पश्चिम बंगाल सरकारच्या राजकीय स्वार्थामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ बंगालमधील शेतकरी घेऊ शकत नसल्याचं सांगत, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सक्रीयपणे काम करण्याऐवजी आज पंतप्रधानांनी शेतकऱ्यांबद्दल टीव्हीद्वारे चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान शेतकरी योजनेद्वारे पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांची मदत करू इच्छित आहेत. परंतु हेच सत्य आहे की ते अर्ध सत्य सांगून लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मोदी सरकारने पश्चिम बंगालच्या मदतीसाठी काहीही केले नाही. त्यांनी ८५ हजार कोटी रुपयांमधील एक हिस्सा देखील दिलेला नाही. ज्यामध्ये ८ हजार कोटी रुपयांची जीएसटीची थकबाकी देखील समाविष्ट आहे.” अस ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

“आपले शेतकरी बांधव नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यांवर उतरत असताना, केंद्र सरकार त्यांची मदत करत नाही केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी प्रचारात मग्न आहे.” असा देखील आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

तर, “पश्चिम बंगालमधील ७० लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. कारण, बंगाल सरकारच्या राजकीय कारणांमुळे त्यांच्या राज्यांमधील शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नाहीत.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, “जर तुमच्या हृदयात शेतकऱ्यांसाठी एवढं प्रेम होतं. तर मग बंगालमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी का आंदोलन केले नाही? का कधीच आवाज उठवला नाही?” असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता.

“पश्चिम बंगाल सरकारच्या राजकीय स्वार्थामुळे ७० लाखांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित”

केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला . तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाच्या मुद्यावर बोलत असताना, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह डाव्या पक्षांवर निशाणा साधल्याचे दिसून आले.