पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकचे (पीएमसी) निलंबित व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जॉय थॉमस दुहेरी जीवन जगत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. थॉमस यांनी आपल्या पर्सनल असिस्टंटशी लग्न करण्यासाठी इस्लामही स्वीकारला होता. इतकेच नव्हे तर पत्नीच्या नावे त्यांनी पुण्यामध्ये नऊ फ्लॅटही विकत घेतले होते. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान थॉमस यांनी अनेक खळबळजनक गोष्टींचा खुलासा केला आहे.

पीएमसी बँकेत ४,३५५ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी थॉमस सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याबरोबरच एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवन हे देखील तुरुंगात आहेत. त्याचबरोबर बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंह यांना देखील याप्रकरणी अटक झाली आहे. दरम्यान, एका चौकशी अधिकाऱ्याने सांगितले की, थॉमस आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांसह राहत असताना त्यांचे पीएसोबत प्रेमसंबंध जुळले. २००५ मध्ये त्यांच्या पीएने नोकरी सोडली त्यानंतर थॉमस यांनी पीएसोबत लग्न करण्यासाठी धर्मांतर केले आणि इस्लाम स्वीकारला. तसेच आपले नावही बदलून जॉय थॉमस जुनैद असे ठेवले.

दरम्यान, थॉमस यांच्या पीएने नोकरी सोडल्यानंतर ती लग्न करुन दुबईमध्ये शिफ्ट झाली असल्याची माहिती बँकेतील लोकांनी होती. मात्र, प्रत्यक्षात ती दुबईला नव्हे तर पुण्यात शिफ्ट झाली होती. लग्नानंतर थॉमस आणि त्यांची पीए पुण्यात राहत होते. कामानिमित्त ते पुण्याहून कायम मुंबईला येत असत. चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले की, थॉमस यांच्या पीएने पुण्यात इतके फ्लॅट कसे काय खरेदी केले याचा तपास सुरु आहे. जर हे फ्लॅट पीएमसी बँकेच्या पैशातून विकत घेतल्याचे उघड झाले तर ते फ्लॅट जप्त केले जातील. या नऊ फ्लॅटची एकूण किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.

६२ वर्षीय थॉमस यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांनी पीएसोबत लग्नानंतर आपले नाव बदलून जुनैद ठेवले होते. मात्र, त्यांच्या या मुस्लिम नावासंबंधी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यांच्या आर्थिक नोंदी, बँक आणि इतर अधिकच्या कागदपत्रांमध्ये देखील त्यांचे नाव जॉय थॉमस असेच आहे. त्यामुळे सुविधा किंवा फायदा लाटण्याच्या उद्देशाने धर्मांतर करण्याबाबतचे हे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी आजवर जॉय थॉमस यांचे मुंबई आणि ठाण्यातील ४ फ्लॅट जप्त केले आहेत. यांपैकी एक फ्लॅट त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनच्या मुलाच्या नावावर आहे. थॉमस आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने एका मुलीला दत्तक घेतले होते, ती आता ११ वर्षांची आहे. त्याशिवाय त्यांचा एक १० वर्षांचा मुलगाही आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा चॉकलेट बनवणे आणि विक्रीचा व्यवसाय आहे, तसेच तिचे एक बुटिकही आहे. त्याचबरोबर पुण्यात असलेल्या नऊ फ्लॅटचे भाडेही तीच वसूल करते. थॉमस यांच्या दुहेरी जीवनाबाबत कळाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्जही केला होता.