घटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता’ हे शब्द वगळण्याबाबत चर्चा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या पीएमकेसह इतरांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहिरातीत हे दोन शब्द वगळण्यात आले होते. घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आलेले ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता’ हे शब्द घटनेच्या प्रस्तावनेतून वगळण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेने बुधवारी केली होती. त्यानंतर, या विषयावर चर्चा व्हावी असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी केले. या दोन्ही बाबी ‘धक्कादायक’ असल्याचे सांगून, विकासाच्या मुद्दय़ावर सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारने त्याला चिकटून राहायला हवे, असे पीएमकेचे संस्थापक एस. रामदॉस हे चेन्नई येथे म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही हे ‘अज्ञान व मतांधता’ यातून केलेले विनाशकारक, निंद्य आणि अवमानकारक वक्तव्य असल्याची टीका केली आहे. तर हे ‘दुर्दैवी’ असून त्यामुळे जगात चुकीचा संदेश जाईल, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.