करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशामध्ये थैमान घातलं असून सर्वच स्तरांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातील केंद्र सरकारचा अंदाज चुकल्याची टीका केली जात आहे. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने योग्य पद्धतीने व्यवस्थापन न केल्याने देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, औषध आणि लसींचा तुटवडा जाणवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयाच्या कामावर नाराजी व्यक्त करत नितीन गडकरींच्या हाती करोना लढाईची सर्व सुत्रं सोपवण्यात यावीत अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयारव निशाणा साधाला आहे.

नक्की वाचा >> “पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या”; भाजपा खासदाराची मागणी

नरेंद्र मोदींमुळे देशावर करोनाचे संकट ओढावले असून त्यामुळे देश आता अक्षरश: गुडघ्यांवर आलाय अशा मथळ्याखालील लेखाची लिंक शेअर करत स्वामींनी पंतप्रधान कार्यालयावर निशाणा साधालाय. “फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा पंतप्रधान कार्यालयाने अशाप्रकारच्या टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे,” असं स्वामी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

स्वामी यांनी काही दिवसापूर्वीच केंद्राला घरचा आहेर देत, पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली होती. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं होतं. “ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं होतं. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली होती. गडकरीच का असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामींनी, “करोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय”, असं सांगितलं होतं.

गडकरींकडे करोनाविरुद्धच्या मोहिमेचा सर्व कारभार द्यावा या स्वामींच्या मागणीला अनेकांनी सहमती दर्शवल्याचं ट्विटरवर पहायला मिळालं. स्वामी यांनी आज सकाळी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा असल्याचं चित्र दिसत आहे.