भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाने मुलायम सिंह यांच्याशी चर्चा केल्याचा दावा समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मुलायमसिंह यांना फोन आला आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत सांगितले. मुलायमसिंह यांनी याबाबत आपले सरकारला समर्थन असल्याचा विश्वास दिला असे सांगत सर्व लोकांच्या मदतीशिवाय सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला नसल्याचेही अमरसिंह यांनी म्हटले. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सल्ल्याने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे होर्डिंग मुजफ्फरनगर येथे लावले आहेत.
समाजवादी युवजन सभेचे मुजफ्फरनगर विभागाचे अध्यक्ष मोहम्मद समशेर मलिक यांनी विविध ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत. लष्कराच्या सन्मानार्थ युवजन सभा मैदानात, सर्जिकल स्ट्राईक करून संपूर्ण जगात भारताची मान उंचावणाऱ्या आमच्या लष्कराचे जवान हिरो तर लष्कराच्या नावावर गलिच्छ राजकारण करणारे झिरो आहेत. अशा आशयाचे होर्डिंग्ज त्यांनी लावले आहेत. अशा पद्धतीचे अनेक होर्डिंग्ज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका २०१७ मध्ये होणार आहेत. त्यातच राजकीय पक्षांकडून सर्जिकल स्ट्राईकवरून होर्डिंग युद्ध सुरू झाले आहे.