लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू असतानाही सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या तिकिटांवर चक्क पंतप्रधान मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोसह भाजपाची जाहिरात करण्यात आली आहे. हे तिकीट सोशल मीडियात व्हायरल झाले असून त्यामुळे टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. नवी दिल्ली विमानतळावर आज (दि.२५) हा प्रकार पहायला मिळाला.

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा फिवर असून आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यातच विविध राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षाच्या जाहिरातींवर भर दिला जात आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने सरकारला आणि राजकीय पक्षांना आपल्या जाहिरातीसाठी सरकारी पैशाचा वापर करता येत नाही. आपल्या पक्षनिधीतून हा खर्च करावा लागतो. मात्र, तरीही एअर इंडियाने आपल्या बोर्डिग पासवर भाजपाची जाहिरात केली आहे.


काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या तिकीटांवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा छापण्यात आली होती. त्यावेळी देखील मोठा वाद झाला होता. दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोमुळे जर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर हे बोर्डिंग पासेस मागे घेतले जातील.

दरम्यान, पंजाबच्या माजी डीजीपींनी शशिकांत आयपीएस नावाच्या आपल्या ट्विटर हँडलवरुन हे तिकीट दाखवणारे ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, माझ्या एअर इंडियाचा तिकिटावर पंतप्रधान मोदींचा फोटो, व्हायब्रंट गुजरातची जाहिरात तसेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा फोटो आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेला अशा प्रकारांवर अंध, मुक-बधिराचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोगावर जनतेचा पैसा का खर्च केला जातो याचे मला आश्चर्य वाटते.