पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या कंपन्यांमधील संचालक चक्क चाळीत राहत असल्याचे समोर आले आहे. यातील गीतांजली जेम्सअंतर्गत येणाऱ्या गिली इंडिया या कंपनीचा संचालक अनियाथ शिवरमण नायर हा कल्याणमधील चाळीत तर दिनेश भाटिया हे काळबादेवी चाळीत राहत असल्याचे समोर आले आहे. आमची फसवणूक झाल्याचा दावा आता त्यांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

देशभरात पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. नीरव मोदी हा या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असून त्याचा मामा आणि गीतांजली जेम्सचा प्रमुख मेहुल चोक्सी देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. सध्या नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय देशाबाहेर आहे. मात्र, त्यांच्या कंपन्यांमधील संचालक आणि वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकत आहेत. या प्रकरणातील गिली इंडिया या कंपनीचा संचालक अनियाथ नायर याच्या घराचा पत्ता कल्याणमधील होता. नायरने कल्याण पूर्व येथील काटेमानवली परिसरात संजीव कॉलनी येथील चाळ नंबर २ रूम नंबर असा पत्ता दिलेला. सीबीआयचे पथक तिथे पोहोचल्याने सर्वांना धक्काच बसला. खोली नायरच्या नावावर असली तरी तिथे त्याने भाडेकरु ठेवलेला आहे. अनियाथ कुटुंबासह कल्याण पूर्वेतच चिंचपाडा परिसरात सदगुरु धाम या इमारतीमधील बी विंग रूम नंबर ५०२ मध्ये राहतो. अनियाथच्या पत्नीने ‘मुंबई मिरर’शी बोलताना हे आरोप फेटाळून लावले. ‘अनियाथ हा कंपनीत अकाऊंटट होता. कागदपत्रांवर दाखवण्यापुरते तुला काही काळासाठी संचालकपद दिले जाईल असे आम्हाला सांगण्यात आले होते,’ असे त्याची पत्नी रिमा यांचे म्हणणे आहे. अनियाथ फरार नसून तो केरळमध्ये आजारी बहिणीला भेटायला गेला आहे, असे रिमा यांनी सांगितले.

याच प्रकरणातील आणखी एक आरोपी दिनेश भाटीया यांची देखील हीच अवस्था आहे. दिनेश भाटिया हे छोटे गुंतवणूकदार आहे. २०१३ मध्ये गीतांजली जेम्सचे काही अधिकारी माझ्या वडिलांच्या संपर्कात आले. त्यांनी कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून माझ्या वडिलांना ऑफर दिली, या मोबदल्यात त्यांनी दोन लाख रुपये देण्याची तयारीही दर्शवली. वडिलांची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेऊन ते निघून गेले. माझे वडील कंपनीत सक्रीय नाही, ते या घोटाळ्यातून कसे बाहेर पडतील हेच कळत नाही, असे त्यांचा मुलगा रौनकने सांगितले. दिनेश भाटिया यांच्या एका मुलाचे लग्न होणार आहे. मात्र या घोटाळ्यामुळे समाजात आमची नाचक्की झाली, असे भाटिया कुटुंबीयांनी सांगितले.