नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही LoUs साठी मला ब्लॅकमेल करायचे अशी कबुली पंजाब नॅशनल बँकेचा माजी उप व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने दिली आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी गोकुळनाथ शेट्टीला इडीने (अंमलबजावणी संचलनालय) अटक केली आहे. अटक झाल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यानच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने ब्लॅकमेल केल्याचे शेट्टीने म्हटले आहे. १३ हजार ७०० कोटी बुडवून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही देशाबाहेर पलायन केले आहे. या प्रकरणी ज्या बँक अधिकाऱ्यांनी या दोघांना मदत केली त्यांना अटक करण्यात आली आहे.  ‘बिझनेस टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा जनरल मॅनेजर राजेश जिंदाल याने २००९ ते २०११ या त्याच्या कार्यकाळात घोटाळा करण्यास हातभार लावला असाही आरोप शेट्टी याने केला आहे. मी तर या घोटाळ्याच्या साखळीची छोटीशी कडी होतो. मुख्य सूत्रधार राजेश जिंदाल होता. त्याने डोळे झाकून एलओयूज पास केले. भ्रष्टाचार करण्यासाठी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला त्याने मदत केली असेही शेट्टीने म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षा ठेव न घेता नीरव मोदीला एलओयूज देण्यात आले असाही आरोप शेट्टीने केला.

मला या दोघांची दहशत वाटत होती आणि ते दोघेही मला ब्लॅकमेल करत होते, त्यामुळे मी खूप तणावाखाली आलो होतो. माझी नोकरी जाईल या भीतीने मी त्यांना मदत केली. माझे वरिष्ठच या घोटाळ्यात सहभागी होते त्यामुळे मी या घोटाळ्याचा एक भाग झालो असेही शेट्टीने चौकशी दरम्यान सांगितले. गोकुळनाथ शेट्टीची इडी कस्टडी बुधवारी संपते आहे. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून शेट्टी याने २००९ ते २०११ या कालावधीत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनाही LoUs उपलब्ध करून दिले होते असा आरोप आहे.

दरम्यान राजेश जिंदाललाही २१ फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली आहे. २००९ ते २०११ या कालावधीत राजेश जिंदाल पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा प्रतिनिधी होता. त्याच्या कारकिर्दीतच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांना एलओयूज देण्यात आले. आता गोकुळनाथ शेट्टीच्या आरोपांनंतर पुन्हा एकदा त्याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.