पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा अखेर ठावठिकाणा लागला. इंटरपोलने सीबीआयला नीरव मोदीबाबत माहिती दिली असून तो सध्या युरोपमध्ये असल्याचे समोर आले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा कुठे आहे, याचा सीबीआयकडून तपास सुरु होता. नीरव मोदी हा परदेशात पळून गेल्याचे समोर आले असले तरी नेमका तो सध्या कुठे आहे, हे स्पष्ट होत नव्हते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलने २ जुलै रोजी नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. नोटिशीत १९२ सदस्य देशांना नीरव मोदी कुठे आढळून आल्यास त्याला अटक करून संबंधित देशाच्या (भारत) ताब्यात देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले होते. नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी यांच्यावर भ्रष्टाचार व फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते.

अखेर इंटरपोलने नीरव मोदीबाबत १६ ऑगस्ट रोजी भारताला माहिती दिली आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार नीरव मोदी हा सध्या युरोपमध्ये आहे. युरोपमधील यंत्रणांनी अद्याप नीरव मोदी कोणत्या शहरात आहे, त्याचा पत्ता किंवा त्याला अटक केली का, याबाबतचा तपशील दिलेला नाही. सीबीआयने आता नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी पत्रव्यवहार सुरु केला आहे.