अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जाला विरोध करतानाच पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, असा दावा मेहुल चोक्सीने न्यायालयात केला आहे. ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात परतणे अशक्य असल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले.

ईडीने ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर दिले आहे. यात मेहुल चोक्सी म्हणतो, मी पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात अजूनही पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र, ईडीने ही बाब न्यायालयापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली, असा दावा त्याने केला.

न्या. एम एस आझमी यांच्यासमोर सोमवारी मेहुल चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य देखील कमी दाखवले आहे, असे चोक्सीचे म्हणणे आहे. चोक्सीने भारतात न परतण्यासाठी पुन्हा एकदा प्रकृतीचे कारण दिले आहे. माझी प्रकृती सध्या चांगली नसून मी विमानाने ४१ तासांचा प्रवास करुन भारतात परतू शकत नाही, असे चोक्सीने म्हटले आहे. ईडीचा तपास कासवगतीने सुरु असून हा वेग पाहता खटला सुरु होण्यासाठी अनेक वर्ष जातील, असे चोक्सीच्या वकिलांनी सांगितले.