इडी आणि सीबीआयने केलेले सगळे आरोप चुकीचे आहे. मला घोटाळ्यात अडकवले जाते आहे आणि माझी मालमत्ता चुकीच्या पद्धतीने सील करण्यात आली आहे असा आरोप मेहुल चोक्सीने केला आहे. पीएनबी घोटाळ्यात फरार झालेला नीरव मोदी याचा हा मामा आहे. अँटिग्वा या ठिकाणी मेहुल चोक्सी वास्तव्यास आहे. या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच मेहुल चोक्सीचा व्हिडिओ समोर आला आहे.

एवढेच नाही तर मी आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते आहे ज्यातही कोणतेच तथ्य नाही असेही मेहुल चोक्सीने म्हटले आहे. मला जाणीवपूर्वक घोटाळ्यात अडकवले गेले आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत असे मेहुल चोक्सी या व्हिडिओत सांगताना दिसतो आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींना चुना लावल्याचा आरोप आहे. या दोघांविरोधातही इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. एवढेच नाही १० तारखेला म्हणजे सोमवारीच नीरव मोदीच्या बहिणीविरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता मेहुल चोक्सीचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मेहुल चोक्सीने त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत.